8 महिन्यापासून पगारवाढीच्या करारावर तोडगा निघत नसल्याने कामगार आक्रमक
मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढे पगारवाढ देण्याची एकमुखी मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- कराराची अंतिम मुदत 8 महिन्यापूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे पगारवाढीच्या नवीन करारावर सुरु असलेल्या सुनावणीत सात ते आठ तारखा होऊन देखील तोडगा निघत नसल्याने लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने मंगळवार (दि.26 डिसेंबर) पासून वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले. उपोषणात सहभागी कामगारांनी मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढे पगारवाढ देण्याची एकमुखी मागणी केली.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन युनियनच्या कामगारांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, लाल बावटाचे सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. सुरेश पानसरे, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, अनिल फसले, प्रवीण भिंगारदिवे, सुनील दळवी, सुनिता जावळे, राधाकिसन कांबळे, सुभाष शिंदे, प्रभावती पाचरणे आदींसह युनियनचे पदाधिकारी, कामगार व महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी नवीन करार तात्काळ करुन पगार वाढ मिळण्यासाठी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या तीन वर्षाच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपली आहे. युनियन व ट्रस्टमध्ये पुढील तीन वर्षासाठी करार होण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुनावणी सुरु आहे. 2020 मध्ये झालेल्या करारात कामगारांना 4750 रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. महागाईच्या काळात कामगारांना जीवन जगणे अशक्य झाले असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मागील वेळी दिलेल्या 4750 पुढे वेतनवाढ मिळाल्यास कामगारांची सहमती असणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर ट्रस्टने 3 टक्क्यांची दिलेली पगारवाढची ऑफर कामगारांनी नाकारली आहे.
कॉ.ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, ट्रस्टने चर्चेने प्रश्न सोडवावा. वेतनवाढ हा कामगारांचा हक्क असून, त्यांना जीवन जगण्यासाठी योग्य पगार असणे अपेक्षित आहे. कामगार व युनियन त्यांच्या भूमिकेवर ठाम असून, हा प्रश्न न सुटल्यास आनखी तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला.
कॉ.ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, ट्रस्टमध्ये दोनशे ते सव्वादोनशे कामगार आहेत. त्यांचा पगार अत्यंत कमी असून, महागाईच्या काळात त्यांना जीवन जगणे देखील अवघड झाले आहे. विश्वस्तांनी कामगारांचा विचार करून तातडीने नवीन करारावर सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सतीश पवार यांनी सर्व कामगारांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे. पगारातून मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. कामगारांच्या संयमाचा अंत पाहू नये. चर्चेने प्रश्न सोडवून योग्य पगारवाढ देण्याचे सांगितले.