अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
मयत वाघाचा पंचनामा न करता जाळणे, झाडे तोडून दरीत लोटणे व जुन्या कामावर नवीन कामाचे बिल काढल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील मौजे खांबे, वरुडी गावात वन विभागामार्फत झालेल्या कामाच्या अपहारा व मयत वाघाला कोणताही पंचनामा न करता जाळल्याप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी या प्रकरणी कारवाई न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील मौजे खांबे, वरुडी गावात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात झालेल्या कामात अपहार केला आहे. सन 2021 ते 2023 पर्यंत जुने खोदलेल्या नाल्यांवर नवीन नाले दाखवून बिल काढले आहे. वन विभागाकडून जमीन मिळालेल्या ग्रामस्थांची पिळवणूक करून आर्थिक देवाण-घेवाणसाठी जाणीवपूर्वक त्रास दिला आहे. गट नंबर 61, 116 मधील कामात मोठ्या प्रमाणात अपहार करून स्वतःच्या हितासाठी बिले काढून घेण्यात आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या भागांमध्ये विजेची लाईन वादळामध्ये तुटली होती. त्या भागात वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्याने त्या तुटलेल्या विजेच्या तारेमुळे वाघ मृत्युमुखी पडला. मात्र त्या कर्मचारीने वन विभाग कार्यालया न कळविता व पंचनामा न करता त्या वाघाच्या मृतदेहाला जाळण्यात आले. याच गटामध्ये शासकीय योजनेचे काम चालू असताना जीसीबीने अनेक झाडे तोडून ती दरीमध्ये लोटून देण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर अपहार व चूकीच्या कामाची दप्तर तपासणी व कामाच्या स्थळाची पहाणी करुन संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना बडतर्फ करावे, वाघाला जाळल्याने गुन्हा दाखल करून त्या कर्मचारीला कायमस्वरूपी बडतर्फ करावे, अधिकारी, कर्मचारी यांच्या मोबाईलची सीडीआर तपासणी करावी, जोपर्यंत तपास होत नाही, तोपर्यंत सदर कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रश्नी कारवाई न झाल्यास 8 जानेवारी पासून ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.