काळे यांचे महिला संघटन व सामाजिक कार्याचे कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नुकतेच बडोदा (गुजरात) येथे मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अधिवेशनचे उद्घाटन श्रीमंत महाराज समरजितसिंह गायकवाड यांच्या हस्ते झाले. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, रेखाताई खेडेकर व राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते काळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अधिवेशन नियोजन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब पवार, मराठा सेवा संघाचे महासचिव डॉ. गिरीश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अशोक पवार, मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, वंदनाताई सावंत, प्रविण मोरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव प्रदीप पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.
अनिता काळे या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन उत्तम प्रकारे महिला संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना अधिवेशनात गौरविण्यात आले.