पदवीधर शिक्षक महासंघाचे निवेदन
समायोजनपासून पाथर्डीचे शिक्षक अजूनही वंचित -महेश डोईफोडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- तालुका स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या असताना देखील पाथर्डी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेले नसल्याचे पदवीधर शिक्षक महासंघाच्या वतीने लक्ष वेधण्यात आले. पाथर्डीच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या मागणीचे निवेदन महासंघाचे राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके व शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी भदगले यांना दिले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांनी निवेदन स्विकारुन यासंदर्भात तालुका प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले. तर भदगले यांनी याबाबत शिक्षणाधिकारी निर्णय घेतील असे स्पष्ट केले. सन 2022 2023 च्या संच मान्यतेनुसार पाथर्डी तालुक्यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केले आहे. त्यानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांनी समायोजन करणे संदर्भात वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 8 डिसेंबर रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे अपेक्षित होते. परंतु आलेल्या हरकती नुसार तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनास मार्गदर्शन मागवले व या समायोजनास स्थगिती देण्यात आली.

पाथर्डी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. आंतरजिल्हा बदलीने व पदावनतीने येणाऱ्या शिक्षकांना पाथर्डी तालुक्यात पदस्थापना दिली. तर सध्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पाथर्डी तालुक्यात जागा राहणार नाही, त्यामुळे अतिरिक्त ठरलेले शिक्षक विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. अतिरिक्त शिक्षकांमध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण बहुसंख्य आहे. त्याचप्रमाणे पती-पत्नी शिक्षक सेवेत असलेल्या शिक्षकांचे प्रमाण देखील आहे. यामुळे अनेक पती-पत्नी शिक्षक व महिला शिक्षक यांची बदली होऊन त्यांची गैरसोय होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यातील बहुतांश तालुक्यांची समायोजन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर न झाल्यास अतिरिक्त शिक्षकांचे पदवीधर शिक्षक महासंघाकडून लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी दिला आहे. यावेळी शिक्षक समितीचे नेते संजय धामणे, शशिकांत बडे, बबन शिंदे, संदीप आंधळे, जना पालवे, अर्चना बडे, वंदना मरकड, सुनंदा होडशीळ, शीला नागरे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी तालुका स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे संदर्भात सूचना दिलेल्या असताना तालुका प्रशासनाने त्या दिलेल्या वेळेत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु पाथर्डी तालुक्यात अतिरिक्त शिक्षक समायोजन अद्यापही झालेले नाही. समायोजनपासून पाथर्डीचे शिक्षक अजूनही वंचित असून, यामुळे शिक्षकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा. -महेश डोईफोडे (राज्य सरचिटणीस, पदवीधर शिक्षक महासंघ)