भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनचा उपक्रम
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व युवकांमध्ये होणार जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- मते विकत घेऊन व जाती-धर्माच्या नावावर निवडून येणाऱ्या व्होटमाफिया विरोधात भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनच्या माध्यमातून लोकशाही कर्तव्य फलित सिद्धांतांचा प्रचार-प्रसार सुरु करण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या वेळी भ्रष्टाचार पेरला म्हणूनच उखडलेल्या खड्डेमय रस्त्यातून भ्रष्टाचाराची पिके जिकडे तिकडे आली असल्याचे शहरातून फिरताना ही बाब सिद्ध होत आहे. यापूर्वी कर्म सिद्धांत प्रसिद्ध होता. या जन्मात चांगले काम केले तर पुढच्या जन्मात चांगला माणूस म्हणून संधी मिळते. परंतु काळाच्या ओघात आणि विज्ञानाच्या, तर्कशास्त्राच्या कसोटीवर कर्म सिद्धांत मागे पडला असून, लोकशाहीत कर्तव्य फलित सिद्धांत नव्याने सिद्ध करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदार मोठ्या संख्येने आपली मते विकतात किंवा जाती धर्माच्या नावावर मतं देतात, त्याच वेळेला व्होटमाफिया निवडणुकीमध्ये थोडी गुंतवणूक करून मागच्या दाराने निवडून येतात. परंतु पुढील पाच वर्षे ते मतदारांची काही एक काम करत नाही. त्यामुळे देशात राष्ट्रीय मत संधारण चळवळ पीपल्स हेल्पलाइनने चालू ठेवली आहे. पैसे घेऊन आणि जातीचे नावावर मते देणाऱ्यांचे मतं फक्त निवडणुकीच्या निकाल लागेपर्यंत जिवंत राहतात. त्यानंतर पुढील पाच वर्षे निवडून आलेल्या उमेदवाराला काही एक प्रश्न विचारता येत नाही. जनतेच्या तिजोरीतील माल टक्केवारीने निवडून आलेले लोक घरी घेऊन जातात. त्यामुळे व्होटमाफिया आमदार, खासदार व नामदारांना झोंबीदार म्हणण्याची पाळी आली आहे. ती माणसे बाहेरून वेगळी दिसतात आणि आत मध्ये फक्त जनतेचे रक्त पिण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे देशातील तमाम मतदारांनी जागे होण्याची गरज असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
मत देताना जे पेरतो तेच उगवणार आहे. भ्रष्टाचार पेरला तर भ्रष्टाचाराचे पीक देशात आल्याशिवाय राहणार नाही.देशाच्या संसदेने निवडणूक आयोगाबद्दलचा कायदा मंजूर केला. त्यामध्ये भारताच्या सरन्यायधीशाला निवड समितीतून पूर्णपणे वगळण्यात आले. यातून भारताचा निवडणूक आयोगा सर्वोच्च न्यायालयासारखा निस्पृह राहिलच याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे यापुढे तमाम जनतेला लोकशाही कर्तव्य फलित सिद्धांत समजून घेऊन त्याचप्रमाणे कृती करण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संघटनेच्या माध्यमातून ओम नमो मातरम या मंत्राचा नामध्यान चळवळ सुरू केली आहे. सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या मंत्राचा आग्रह व अंमलबजावणीसाठी संघटना प्रयत्नशील आहेत. या मोहिमेसाठी अशोक सब्बन, ओम कदम, जालिंदर बोरुडे, ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, नांदगावचे सरपंच सखाराम सरक, प्रकाश थोरात आदी प्रयत्नशील आहेत.
