पात्र विद्यार्थ्यांना डावलून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गैरमार्गाने प्रवेश दिल्याचा आरोप
निवड समिती व संचालकांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गैरमार्गाने दिलेले प्रवेश रद्द करुन प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवावी व यासंदर्भात चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, दत्ता वामन, सदाशिव निकम, जिल्हाध्यक्ष उत्तमराव पवार, शाहीर कान्हू सुंबे, विजय थोरात, विजय नाझीरकर, मेजर शिवाजी वेताळ, मेजर शेलार, नितीन थोरात, ॲड. महेश शिंदे, ह.भ.प. राजू महाराज पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष विनोद साळवे आदी सहभागी झाले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सलग्नित असलेल्या शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया शासन निर्णयानुसार ऑनलाईन तसेच ऑफलाईन घेण्यात आली. मात्र पात्र विद्यार्थ्यांना डावलून काही कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने संचालक मंडळ यांच्या संगणमताने भ्रष्टाचार करुन प्रवेश देण्यात आला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करुन शिक्षण सचिवांकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे.
या संस्थेतील यापूर्वीची शिक्षक भरती प्रक्रिया देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. संचालक मंडळाचे बदल अर्ज धर्मदाय उपायुक्तांकडे प्रलंबीत असतानाही सध्याचे संचालक कोणत्या अधिकाराने कारभार करत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. पात्र विद्यार्थ्यांना डावलून गैरमार्गाने कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे ही गंभीर बाब असून, याप्रकरणी खातेनिहाय चौकशी करावी, डावलण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा व दोषी निवड समिती व संचालक वरती गुन्हे दाखल करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेने केली आहे.