प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना प्रमाणपत्राचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने शहरातील तुषार कदम द शार्प कट्सच्या वतीने सलून व पार्लर प्रशिक्षण वर्गातील युवक-युवतींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
अकॅडमीचे संचालक तुषार कदम, भरोसा सेलच्या सहाय्यक निरीक्षक दिपाली देशमुख व सिने अभिनेत्री पल्लवी दिवटे यांच्या हस्ते प्रशिक्षित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी श्री संत सेना महाराज मंदिर ट्रस्ट, भिंगार व नागरदेवळे, नाभिक समाज व महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि अहमदनगर जिल्हा सलून चालक मालक असोशिएशनचे पदाधिकारी व प्रशिक्षणार्थी युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुषार कदम म्हणाले की, युवकांनी स्वत:मध्ये क्षमता निर्माण करून सक्षम व्हावे. क्षमता निर्माण होण्यासाठी व्यावसायिक शिक्षण काळाची गरज बनली आहे. शिक्षणाला व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास बेरोजगारीचा प्रश्न कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक निरीक्षक दिपाली देशमुख म्हणाल्या की, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम कौतुकास्पद आहे. कौशल्यक्षम भारत घडविण्यासाठी सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रशिक्षण शिबिरात युवक-युवतींना हेअर, मेकअप, नेल आर्ट, स्किन केअर व मेहंदी यांचे अद्यावत प्रशिक्षण देण्यात आले.