• Tue. Jul 22nd, 2025

पिक विमा मिळण्यासाठी कर्जतच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

ByMirror

Dec 12, 2023

विमा रकमेचा हिस्सा भरून देखील पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या त्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

नुकसानीने होरपळले असताना पिक विमा कंपनीकडून पिळवणूक होत असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना व शेतकऱ्यांनी विमा रकमेचा हिस्सा भरून देखील पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कर्जत येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. कंपनीला पत्र व्यवहार करून देखील प्रतिसाद मिळत नसून, जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयाकडून सूचना आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश असताना देखील कंपनीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर नुकसानीने होरपळले असताना पिक विमा कंपनीकडून पिळवणूक होत असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया दिल्या.


शेतकऱ्यांच्या या उपोषणात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून त्यांना पाठिंबा दिला. उपोषणात अशोक कदम, आबासाहेब निंबाळकर, राजेंद्र भोसले, सतीश ननवरे, शहाजी ननवरे, विलास डिसले, गंगाराम हंडाळ, नवनाथ डिसले, सुभाष जाधव, विकास जाधव, बबन जाधव, शरद डिसले, तात्या डिसले, भास्कर भिसे, अनिल भोसले, रमेश कोकरे, गोवर्धन जाधव, लालासाहेब सुद्रिक आदींसह कर्जत येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कर्जत येथील शेतकऱ्यांचे सन 2022-23 च्या खरीप हंगामात मोठे नुकसान झालेले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्वतः शेतकरी यांनी विमा रकमेचा हिस्सा भरून देखील त्यांना पिक विमा मिळालेला नाही. कंपनीला वारंवार पुरवठा करून देखील कंपनीने पिक विमा परतावा दिलेला नाही. अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही कंपनीने काही प्रतिसाद दिलेला नाही. कंपनीला क्लेम इंन्टीमेशन, कृषी अधिकारी यांचे पत्रव्यवहार, जिल्हाधिकारी यांच्या सूचना व मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश असताना देखील कंपनीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्यांची व प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक केली असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.


शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. कंपनीने विमा हप्त्यापोटी कर्जत तालुक्यातून 41 लाख 80 हजार रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केलेले आहे. त्यातील काही शेतकऱ्यांनी पूर्व सूचना देऊन देखील त्यांची दखल कंपनीने घेतली नाही. कंपनीचे विमा अधिकारी यांनी कर्जत मध्ये येऊन फक्त पोकळ आश्‍वासने दिली. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करुन पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *