• Tue. Jul 22nd, 2025

शहरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारणीत आरक्षण विषयावर भूमिका स्पष्ट

ByMirror

Dec 10, 2023

महाराष्ट्रातील सर्व कंपन्या व आस्थापनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची चळवळ सुरु करण्याची घोषणा

मराठ्यांना आरक्षण मिळत नसेल तर, केंद्र शासनाने घटना दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवावी -दिलीपदादा जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला पाठिंबा असून, त्यांच्या मागणीनुसार आरक्षण मिळत नसेल तर, केंद्र शासनाने घटना दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवावी व मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ ही भूमिका घेऊन पुढे जाणार असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपन्या व आस्थापनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची चळवळ सुरु करुन यासंदर्भात सरकारकडे शासन निर्णय काढण्याची मागणी देखील केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


अखिल भारतीय मराठा महासंघाची राज्य कार्यकारणी बैठक शहराच्या हॉटेल सुवर्णम प्राईडमध्ये पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, कोषाध्यक्ष श्रीरंग बर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, युवक अध्यक्ष रणजीत जगताप, राष्ट्रीय चिटणीस दशरथ पिसाळ, जयश्री साळुंखे, मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, रवींद्र काळे, ज्ञानेश्‍वर काकडे, युवक प्रदेश उपाध्यक्ष परशुराम कासुळे, जिल्हाध्यक्ष बिभीषण खोसे, एन.बी. धुमाळ, राज गवांदे, रावसाहेब मरकड, पै. नाना डोंगरे, गंगाधर बोरुडे आदींसह राज्य व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी राज्य कार्यकारणीच्या बैठकीत 7 फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनच्या नियोजनार्थ चर्चा करण्यात आली. तर या अधिवेशनमध्ये घेण्यात येणाऱ्या ठरावासंदर्भात चर्चा करुन पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली.


पुढे दिलीपदादा जगताप म्हणाले की, महाराष्ट्रात आरक्षणावरुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोणीही उठून कायापण बोलत आहे. एका पंगतीत जेवणारे आरक्षणाच्या विषयावरून वैरी झाले आहेत. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. तेथे आरक्षणावरुन जातीय भांडण निर्माण होत असल्याचे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात एकप्रकारे दंगल सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. आता दोन भाऊ आरक्षणासाठी समोरासमोर येऊन उभे ठाकले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


25 जुलै रोजी दिल्ली येथे धरणे आंदोलन करून केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयातून या संदर्भात फोन आला व केंद्र सरकारने संबंधित विभागाला कार्यवाहीसाठी पाठविले असल्याचे कळविले आहे. हे या चळवळीचे यश आहे. मराठा समाजाला रक्तपात करून आरक्षण नको आहे. जरांगे यांच्या पाठीशी कोणतीही शक्ती नसून, सर्वसामान्य मराठा समाजाची ताकद उभी राहिली आहे. मात्र त्याच्या अंगावर काही ओबीसी नेते सोडले गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


ओबीसी व मराठा एकमेकांच्या विरोधात जाण्याचा प्रश्‍न नव्हता, मात्र खालच्या पातळीवर टीका करण्यात आल्याने हा वाद उफळला आहे. ओबीसी विरुध्द मराठा हे भांडण भुजबळामुळे निर्माण झाल्याचा आरोपही जगताप यांनी केला. तर समाजामध्ये भांडण नको आहेत, घटनेत बदल करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही या मागची मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवरायांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा राज्यातील प्रत्येक आस्थापनामध्ये लावण्यास बंधनकारक करण्याचे महासंघाने मागणी केली आहे. यासाठी चळवळ चालविण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात मराठा महासंघा खाजगी कंपनी, आस्थापनांना सरकारने प्रमाणित केलेया शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लावण्यासाठी दिल्या जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


संभाजी दहातोंडे यांनी घटनेप्रमाणे 50% च्या वर आरक्षण मिळणे कठीण आहे. मराठा समाजाला यासाठी घटनादुरुस्ती करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून आरक्षण पदरात पाडून घ्यावे लागणार आहे. या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला व भूमिकेला महासंघाचा पाठिंबा असून त्यांच्या म्हणण्यानुसार आरक्षण दिले तर योग्यच आहे; अन्यथा घटना दुरुस्तीचा मार्ग अवलंब करावा लागणार लागणार असल्याचे, ते म्हणाले. मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी कशाप्रकारे घटनेत दुरुस्ती करून, समिती नेमून आरक्षण मिळवता येणार असल्यासंदर्भात माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *