परीस फाउंडेशनने केली युवकांसह नागरिकांची आरोग्य तपासणी
निरोगी व दीर्घायुष्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न-धान्य उपयुक्त -पद्मश्री पोपट पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतमाल, तृण धान्य, डाळी, ज्वारी-बाजरी, गहू, मटकी वाटाणा हे निरोगी व दीर्घायुष्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, रासायनिक खतांच्या अतिवापराने मनुष्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पटेल मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री पवार बोलत होते. या महोत्सवात परीस फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर राबवून युवकांसह नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, ॲड. सुनील तोडकर, परीसच्या अध्यक्ष निकिता वाघचौरे, वर्षा काळे, डॉ. रमेश वाघमारे आदी उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले की, आजच्या युवकांनी फास्टफुडच्या आहारी न जाता सदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीतून आलेल्या भाजीपाला, फळे तृणधान्य खाण्याचा आग्रह धरण्याचे आवाहन केले.
युवा महोत्सवानिमित्त लोकनृत्य, लोकगीत, पोस्टर, छायाचित्र स्पर्धा पार पडली. या दोन दिवसीय महोत्सवात बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहे. परीस फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मध्ये रक्तांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. युवक कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने वैशाली कुलकर्णी, बाळू धोंडे, सागर फुलारी, अरबाज शेख, प्रांजली झांबरे, शिवाजी जाधव आदींनी रक्ताच्या विविध तपासण्या केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरती शिंदे, मीना म्हसे, नयना बनकर, मीना पाचपुते यांनी परिश्रम घेतले.