• Mon. Jul 21st, 2025

आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य खुलणार -स्वाती अट्टल

ByMirror

Dec 5, 2023

महिलांच्या सौंदर्यावर व्याख्यान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य टिकविण्यासाठी महिलांनी प्रत्येक ऋतूनुसार आहार, निसर्गोपचार पध्दतीने घरगुती उपचाराचा अवलंब करावा. आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य खुलणार आहे. यासाठी महिलांनी आहार व आरोग्याबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन ब्युटीशियन स्वाती अट्टल यांनी केले.


प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांच्या सौंदर्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अट्टल बोलत होत्या. यावेळी दंतरोग तज्ञ डॉ. कीर्ती कोल्हे, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, सुशीला त्र्यंबके, स्वाती इंदानी, स्वाती गुंदेचा, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, मेघना मुनोत, जयश्री पुरोहित, ज्योत्स्ना कुलकर्णी, हिरा शहापुरे, मनीषा देवकर, उज्वला बोगावत, सुजाता पुजारी, साधना भळगट आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे अट्टल म्हणाल्या की, आरोग्य व सौंदर्य चांगले राहिल्यास त्या महिलेत एक आत्मविश्‍वास निर्माण होतो. सौंदर्य खुलविण्यासाठी केस व त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.


दातांच्या आरोग्यावर बोलताना डॉ. कीर्ती कोल्हे म्हणाल्या की, महिला स्वत:ला वेळ देत नसल्याने त्यांच्या दातांच्या समस्या देखील वाढत आहे. दात हे शरीरातील महत्त्वाचा भाग असून, त्याची दैनंदिन काळजी देखील घेतली गेली पाहिजे. सकाळची सुरुवात दातापासून होते असते, पण त्याची योग्य निगा राखली गेली पाहिजे. योग्य अन्नपचन झाले नाही, तर शरीरात व्याधी निर्माण होतात. यासाठी दातांची उत्तमप्रकारे निगा राखण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.


प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी मागील पंचवीस वर्षापासून महिलांसाठी प्रयास ग्रुप कार्य करीत आहे. महिलांच्या सर्वांगीन विकास व आरोग्याची काळजी घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी माहिती दिली. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


महिलांसाठी मेघना मुनोत यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या. यामध्ये सनवीन ओबेरॉय, माधवी गोरे, मनीषा पवार, गीतांजली सोनाग्रा, छाया शिंदे, सविता धामट, सरस पितळे, मंगल चोपडा, वर्षा वाबळे यांनी बक्षीसे पटकाविली. विजेत्या महिलांना स्वाती इंदानी यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी केले. आभार ग्रुपच्या सचिव जयश्री पुरोहित यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *