राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगणार काव्यांची मैफल
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांची निवड करण्यात आली.
नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 12 जानेवारी रोजी नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी पालवे यांना दिले.
ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान असून, ज्येष्ठ कवी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. त्यांच्या विविध पुस्तके व काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले असून, रुसलेल्या सावल्या, तृण अग्निमळे, स्वगत हे काव्य संग्रह त्यांचे राज्यभर प्रसिध्द आहेत. साहित्य क्षेत्रातील विविध संघटनांचे पद ते भूषवित असून, त्यांना पुणे विद्यापिठाचे काव्यवाचन पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार, भारतीय दलित साहित्य अकादमी आंबेडकर फेलोशीप (नवी दिल्ली) व डॉ. के.सी. कऱ्हाडकर साहित्य साधना यांसह विविध साहित्य क्षेत्रातील 55 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.
काव्य संमेलनाच्या निवड समितीने एकमताने पालवे यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी मंजूरी दिली. काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल त्यांचे कवी तथा मुख्याध्यापिका अनिताताई काळे, गिताराम नरवडे, रज्जाक शेख, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, आनंदा साळवे, मुख्याध्यापक हबीब शेख, गुलशन जमादार यांनी अभिनंदन केले आहे.
