धर्मांतराच्या गैरसमजूतीमधून हल्ला होण्याची भिती व्यक्त
पोलीस संरक्षण मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्व्हे नंबर 126 शासकीय गोडाऊन नगर-पुणे रोड, कायनेटिक चौक येथे मागील 12 वर्षापासून राहत असलेल्या पारधी समाज बांधवांनी पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा) कायद्यांतर्गत सदर मिळकतीला नावे लावण्याची मागणी केली आहे. तर कोणीही धर्मांतर केलेले नसल्याचे स्पष्ट करुन हिंदूत्ववादी संघटनेच्या पदाधिकारीकडून हल्ला होण्याची भिती व्यक्त करुन पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी पोपट चव्हाण, राहुल काळे, मेघा चव्हाण, बाळू काळे, सीमा चव्हाण, विशाल चव्हाण, सुरूबाई काळे, रोनक चव्हाण, विपुल काळे, जया काळे, माधुरी चव्हाण, गणेश चव्हाण, सुवर्णा चव्हाण, ज्योती चव्हाण आदींसह पारधी समाज बांधव उपस्थित होते. सन 2010 पासून भूमिहीन पारधी समाज बांधव आपल्या कुटुंबासह सर्व्हे नंबर 126 शासकीय गोडाऊन नगर-पुणे रोड, कायनेटिक चौक येथे राहत आहे. शहरात काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. येथे राहत असलेल्यांना आजपर्यंत शासनाने घरकुल दिलेले नाही. तरी पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा) कायद्यांतर्गत सदर पारधी समाज बांधवांची नावे या मिळकतीला लावण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच या जागेत असलेले एका लॉ कॉलेजचे बेकायदेशीर अतिक्रमण काढावे, एका हिंदूत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने या परिसरातील पारधी समाजाने धर्मांतर केल्याचे म्हणने असून, येथील कोणत्याही पारधी समाज बांधवाने धर्मांतर केलेले नाही. या धर्मांतराच्या गैरसमजूतीमधून हिंदूत्ववादी संघटनेचा पदाधिकारी रोष व्यक्त करत आहे. यामुळे येथील पारधी समाजावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.