मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग हिताचे निर्णय घेतले -ॲड. लक्ष्मण पोकळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांचा रोजगार व त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग हिताचे कार्य केले असल्याची भावना प्रहार दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील एसटी बस स्थानकामध्ये दिव्यांगांसाठी 10 टक्के स्टॉल राखीव ठेवणार, त्याचप्रमाणे शासकीय नोकरीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली व स्वधारच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी योजना तयार करणार असे विविध निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचा अभिनंदनाचा ठराव संघटनेच्या वतीने मांडण्यात आला आहे. या योजनेच्या घोषणेमुळे दिव्यांगांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे ॲड. पोकळे यांनी म्हंटले आहे.
सदरच्या निर्णयामुळे राज्यातील दिव्यांगांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने व शासकीय नोकरीमध्ये पडताळणीमुळे खऱ्या दिव्यांगानाच न्याय मिळणार आहे. सर्व दिव्यांगापर्यंत दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख मार्गदर्शक बच्चू कडू यांनी गरजूंपर्यंत सदर निर्णयाची माहिती व्हावी असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे शासकीय विभागांमध्ये मानधनावरील कंत्राटी पदे भरताना दिव्यांगांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे.
गटई कामगारांप्रमाणे दिव्यांगांनाही व्यवसायासाठी स्टॉल देण्यात यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे. सदर निर्णयामध्ये अंधांसाठीही विशेष बाबीचा विचार करण्यात आला असून, त्यामध्ये लेखनिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सदर निर्णयामुळे राज्यातील सर्व स्तरातील दिव्यांग मुख्य प्रवाहात येतील असा विश्वास प्रहार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.