जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचावचा नारा देत शहरातून निघणार रॅली
समविचारी पक्ष व संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या वतीने शाहू महाराजांचे जन्मगाव कोल्हापूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी नागपूर दरम्यान निघालेली राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा शहरात गुरुवारी (दि.30 नोव्हेंबरला) दाखल होणार आहे. जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचाव राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रेच्या शहरात स्वागतासाठी समविचारी पक्ष व संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रेचे निमंत्रक ॲड. सुधीर टोकेकर यांनी केले आहे.
20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान आयटकच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा 30 नोव्हेंबरला अहमदनगर शहरात दाखल होणार आहे. यामध्ये कामगार वर्ग व भाजप विरोधातील समविचारी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 30 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅली काढण्यात येणार आहे. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, माळीवाडा येथील महात्मा फुले यांचा पुतळा, वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीचे मार्गक्रमण होणार आहे.
तर या रॅलीचा समारोप स्वस्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार होऊन, त्या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी आयटक व इतर कामगार संघटनांचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या स्वागतासाठी व सभेसाठी जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना, लालबावटा विडी कामगार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था व जिल्हा कर्मचारी संघटना, लालबावटा जनरल कामगार, तलरेजा फर्म कर्मचारी, अवतार मेहेरबाबा कामगार युनियन, मोहटादेवी कामगार संघटना, लालगीर बुवा ट्रस्ट व डावे पक्ष प्रयत्नशील आहेत.