विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध होणार शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावरील पुस्तके
शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतून दिसून येतो -संतोष कानडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अहमदनगर शाखेच्या वतीने संविधान दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयासाठी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावरील शाहूंच्या आठवणी या पुस्तकांची भेट देण्यात आली.
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव संतोष कानडे यांनी वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना पुस्तकांचे संच सुपुर्द केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, शशीकांत लाटे, मोहम्म्द इकबाल शेख आदी उपस्थित होते.
संतोष कानडे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केल्या. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागांची तरतूद केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मनुष्याला सुसंस्कृत बनविण्याकरीता पुस्तके भावी पिढीत विचार रुजवतात. बहुजन समाजाला दिशा देणारे शाहू महाराजांचे विचार नवीन पिढी पर्यंत जाण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास साधला जातो. लहान मुले मोबाईलमध्ये गुरफटल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. त्यामुळे लहान वयातच बालकांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करण्याची गरज आहे. या उद्देशाने गावात वाचनालय चालवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करुन दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
विजय भालसिंग यांनी ज्ञानाचा कायमस्वरूपी ठेवा पुस्तकरुपाने टिकवता येतो. ज्ञानाचा मुख्य स्त्रोत म्हणून पुस्तकाचे महत्त्व आजही टिकून आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कारी बनविण्यासाठी वाचनाकडे वळविण्याची गरज असून, त्या उद्देशाने राबविण्यात आलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.