यादव यांनी कामातून खाकीचा दरारा निर्माण केला -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुन्हेगारांवर वचक बसवून शहरात शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य करणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व त्यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचा मेडल घालून सन्मान केला. यावेळी संजय सावंत, सुहास पाथरकर, मुकुंद वाळके आदी उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, कोतवाली पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारून चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली हद्दीत गुन्हेगारांवर वचक बसविला आहे. अवैधधंदे चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. गुंडगिरी करणारे व रोड रोमीयोंवर प्रतिबंधात्मक कारवाई करून खाकीचा धाक निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे जनसामान्यांमध्ये पोलीस दलाबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली असून, रोड रोमीयोंच्या बंदोबस्ताने महिला व युवतींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. सामाजिक भावनेने काम करणारा पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या कामातून खाकीचा दरारा निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.