मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उपक्रमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला.
नवनाथ विद्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्यध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, दत्तात्रय जाधव, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे आदी उपस्थित होते.
किसन वाबळे यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या जीवनातील संघर्ष व शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिलेली दिशा यावर प्रकाश टाकला. पै.नाना डोंगरे यांनी सुशिक्षित समाजाची निर्मिती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झाली. शिक्षणावर ठराविक लोकांची मक्तेदारी त्यांनी मोडित काढून, महिलांसह सर्वांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करुन दिल्याचे सांगितले. मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून, मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचे त्यांनी आवाहन केले.