• Wed. Jul 23rd, 2025

रक्तदानाने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

ByMirror

Nov 25, 2023

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त उपक्रम

रक्तदान शिबिराला युवक-युवतींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व त्यागाचे स्मरण करुन रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर रक्तदानाने यामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबिराला युवक-युवतींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


बुरुडगाव रोड येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयात झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य खालिद जहागीरदार यांच्या हस्ते झाले. यावेळी एचडीएफसी बँकचे श्रीनिवास रसाळ, रोटरी इंटेग्रिटीच्या अध्यक्षा चंदना गांधी, सचिव शुभश्री पटनायक, समन्वयक रवी डिक्रुज, निखिल कुलकर्णी, दिनकर टेमकर आदी उपस्थित होते.


खालिद जहागीरदार म्हणाले की, रक्त हा असा घटक आहे की, तो कृत्रिमरित्या तयार होत नाही. रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. प्रत्येक समाजातील युवकांनी सामाजिक जाणीव ठेऊन रक्तदान करण्याची गरज आहे. काही दुर्घटना घडल्यास रक्तदाता हा त्या गरजू व्यक्तीचा जीवदाता ठरतो. सामाजिक बांधिलकीने प्रत्येकाने रक्तदान चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.


चंदना गांधी म्हणाल्या की, एक व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे तीन व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. दुसऱ्यांसाठी जगणे, हेच खरे जीवन असून, मानवतेसाठी प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज आहे. रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्‍यक बाब बनली आहे. ही मानवतेची चळवळ गरजू रुग्णांना जीवदान देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात आयटीआय महाविद्यालयाच्या युवक-युवतींसह, शिक्षक, शिक्षकेतर, रोटरीचे सदस्य व एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी आनंदऋषी हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल, अहमदनगर महानगरपालिका रक्तपेढी, कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.ई. खाकाळ सर यांनी केले. आभार एस.ए. गावंडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *