नवनागापूरच्या भाजी मार्केटची स्वच्छता व इतर सुविधा पुरविण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जात असल्याचा खुलासा
भाजी मार्केटच्या स्वच्छतेसाठी ना हरकत मिळण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट मध्ये व्यावसायिक, भाजी विक्रेत्यांना मार्केटमधील परिसराची स्वच्छता व इतर सुविधा पुरविण्यासाठी नाममात्र आकारल्या जाणाऱ्या वीस रुपये शुल्काची पोलीस स्टेशनला जबरदस्तीने पैसे वसुलीची खोटी तक्रार देणाऱ्यावर कारवाई करावी व भाजी मार्केटच्या स्वच्छतेसाठी ना हरकत मिळण्याची मागणी नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला आघाडी अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
नवनागापूर सह्याद्री चौक नगर-मनमाड महामार्गा शेजारी नागपूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने पंधरा वर्षापासून मार्केट चालविण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याने या परिसरात अस्वच्छता पसरुन अतिशय दुर्गंधी निर्माण झाली होती. याचा स्थानिक व्यावसायिक, भाजी विक्रेते व नागरिकांसह ग्राहकांना देखील त्रास सहन करावा लागत होता. तर नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले होते. यासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज करण्यात आला होता. त्यांनी अर्जाची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांना आदेश देऊन स्वच्छतेसाठी परवानगी देण्याचे ग्रामपंचायत कार्यालय नवनागपूर यांना आदेश दिले. त्या आदेशाचे पालन करून ग्रामविकास अधिकारी, सरपंच व उपसरपंच यांनी 28 मार्च रोजी कंपनी चौक ते गरवारे चौक पर्यंत साफसफाई करण्यास ग्रामपंचायतची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र देण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यानंतर 20 नोव्हेंबर पासून नवनागापूर येथील नगर मनमाड महामार्गावरील नागपूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट मधील व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांकडून मार्केट मधील परिसराची स्वच्छता, लाईट व इतर सोयी-सुविधा देण्यासाठी वीस रुपये देणगी गोळा करण्यात आली. व्यावसायिकांनी देखील सुविधा मिळत असल्याने ही देणगी स्वखुशीने दिली. मात्र काही व्यक्तींनी जबरदस्तीने पैसे वसुलीची खोटी तक्रार पोलीसांकडे केल्याने पोलीस देखील गुन्हे दाखल करण्याची तयारी दाखवीत आहे. तरी या संदर्भातील पार्श्वभूमी लक्षात घेऊन मार्केटच्या स्वच्छतेसाठी व सुविधा पुरविण्यास सहकार्य करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.