ग्रामस्थांच्या सोयीसाठी रस्ता खुला करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे आदेश होऊन देखील मौजे रायगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील रस्ता खुला होत नसल्याने तक्रारदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. तर तात्काळ रस्ता खुला करण्याची मागणी केली.
तक्रारदार शेतकरी जवाहर पठारे व राहुल कदम यांनी केलेल्या उपोषणात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, सलिम अत्तार आदी सहभागी झाले होते. या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी, दलित पँथर, बहुजन समाज पार्टी, लहुजी शक्ती सेना, संत रविदास चर्मकार युवा महासंघ, आरपीआय, बामसेना संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
रायगव्हाण गावठाण ते बेटवस्ती (दलित वस्ती) कडे जाणारा रस्ता शंभर वर्षांपूर्वीचा जुना रस्ता काही व्यक्तींना बंद केला आहे. या रस्त्याचा वापर बेट वस्ती, राजापूर गाव, म्हसे गाव व लहानु पुला जवळील 400 ते 500 लोकसंख्या असलेले ग्रामस्थ या रस्त्याचा वापर रहदारीसाठी करत आहे. मात्र हा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. परिणामी शेती पड अवस्थेत आहे.
या रस्त्याच्या प्रश्नासाठी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने रस्ता खुला करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार 23 मे रोजी रस्ता खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व 25 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहे. तर श्रीगोंदा तहसीलदार यांनी 13 एप्रिल रोजी रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिलेला होते. तरी देखील रस्ता खुले करण्याबाबतची कार्यवाही अद्यापि झालेली नसल्याचे तक्रारदार शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आदेश होऊन देखील रस्ता खुला होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करुन सदर रस्ता खुला करुन देण्याची मागणी केलेली आहे.