अध्यात्मिक शिदोरी असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढी घडणार -इंजि. संतोष उदमले
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या सुट्टीत पायी वारी करून अध्यात्मिक दिवाळी साजरी करणारे भारत कांबळे हे शिक्षक अध्यात्मिक वारसा आगळ्या-वेगळ्या प्रकारे जोपासत आहे. दिवाळी सुट्टी लागल्यावर अनेक शिक्षक, विद्यार्थी सहकुटुंब सहलीला जातात व दिवाळीचा आनंद लुटतात. मात्र कांबळे मास्तर हाती वीणा घेत पंढरीची वाट धरुन अध्यात्मिक आनंद घेण्यासाठी निघतात.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील कानिफनाथ माध्यमिक विद्यालयात भारत कांबळे हे शिक्षक 25 वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करतात. इंग्रजीचे शिक्षक असलेले कांबळे तसगावात राहतात. ते सुटी लागली, की भाऊबीजेपर्यंत कुटुंबीयांसह घरी दिवाळी साजरी करतात. पत्नीला भाऊबीजेला माहेरी सोडून दुसऱ्या दिवशी आपली आध्यात्मिक सहल सुरू करतात.
एसटीने थेट आळंदी गाठतात. दोन दिवस ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीजवळील अजानवृक्षाजवळ ज्ञानेश्वरीचे मनोभावे पारायण करतात. पारायण होताच पुन्हा घरी येतात. हाती वीणा घेतात, खांद्यावर कपड्यांची पिशवी घेत पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास सुरू करतात. वाटचालीत मुक्काम पडला, तर एखाद्या मंदिरात राहतात. सकाळी पुन्हा पंढरीकडे मार्गस्थ होतात.
दररोज 50 किलोमीटरचा अंतर ते कापतात. जेवणाची सोय आपोआप होते. चार दिवसांत प्रवास पूर्ण करून पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात मनोभावे दर्शन घेऊन प्रवासाला निघतात. अध्यात्मिक आनंद मनात साठवत कांबळे सर इंग्रजीचे धडे विद्यार्थ्यांकडून पुन्हा गिरवून घेण्यासाठी कार्तिकी एकादशीनंतर पुन्हा शाळेत परत येतात. यंदा त्यांच्या समवेत आबाजी आंधळे, विठ्ठल मतकर व आदिनाथ वाघ कार्तिकीची पायी वारी करत आहेत. त्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. संतोष रवींद्र उदमले यांनी शुभेच्छा दिल्या. तर अध्यात्मिक शिदोरी असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढी घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.