बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल -चंद्रकांत पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल. आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह यादृष्टीने प्रेरणादायी आहे.

चिमुकल्यांच्या बालविश्वातील प्रत्येक विषय अगदी सहजसोप्या व लयबद्ध रीतीने कवीने या काव्यसंग्रहात गुंफला आहे. प्रत्येक बालवाचक व पालक-शिक्षकांपर्यंत हा काव्यसंग्रह पोचायला हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.

साहित्यिक व कवी डॉ. सुदर्शन चंद्रशेखर धस यांच्या आनंदाने गाऊया या बालकविता संग्रहाचे प्रकाशन बालदिनी करण्यात आले. यावेळी पालवे बोलत होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य सुरेश थोरात, प्राचार्य डॉ.रविंद्र चोभे, ऋतू प्रकाशनाचे प्रा.डॉ. चंद्रकांत जोशी, शब्दगंधचे सुनिल गोसावी, शर्मिला गोसावी, सप्तरंग थिएटर्सचे डॉ. शाम शिंदे, सुभाष सोनवणे, शाहीर अरूण आहेर, रघुनाथ आंबेडकर, कृष्णकांत लोणे, त्र्यंबक देशमुख, वसंत कर्डिले आदींसह साहित्यिक व रसिक उपस्थित होते.
मान्यवर साहित्यिक तसेच चिमुकल्यांच्या हस्ते या बालकविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कु. समिक्षा धस हिने काव्यसंग्रहातील एक कविता अतिशय गोड आवाजात सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुदर्शन धस यांनीही बालकाव्य लेखनामागील आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनवणे व सुनील धस यांनी केले. आभार संतोष कदम सर यांनी मानले.