मनुष्याच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी धन्वंतरीचे पूजन
निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद -डॉ. संतोष गिऱ्हे
अहमदनगर (प्रतिनिधी)- उमंग फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेदिक औषधाचे जनक धन्वंतरी देवाचे पूजन करुन धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली. मनुष्याच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून आयुर्वेदाचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरातील संजीवनी आर्थो स्पाईन हॉलिस्ट सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, छावा संघटनेचे रावसाहेब काळे, शैलेश रोहोकले, गणेश मुळे, सदाशिव निकम, विनोद साळवे, सम्राट साळवे, ॲड. अनिता दिघे, वैशाली कुलकर्णी, दीपाली लखारा, सुमित लखारा, धनाजी बनसोडे आदी उपस्थित होते.
डॉ. संतोष गिऱ्हे म्हणाले की, निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. निरोगी आरोग्यासाठी पुन्हा आयुर्वेदाकडे वळावे लागणार आहे. भारताने आयुर्वेद ही जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. झटपट आजार बरे करणाऱ्या इतर औषधांचे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. आयुर्वेद मात्र मनुष्याच्या सर्व व्याधी व दुर्धर आजार मुळापासून बरे करतो. याचे दुष्परिणाम देखील होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब काळे यांनी उमंग फाउंडेशनच्या माध्यमातून आयुर्वेदचा प्रचार प्रसार सुरु आहे. तसेच नागरिकांसाठी विविध शिबिराच्या माध्यमातून सेवा देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर आयुर्वेदच्या माध्यमातून अनेक असाध्य रोगावर नियंत्रण मिळवून ते कायमचे नष्ट करता येत असल्याचे स्पष्ट केले.