बहुजन समाज पार्टीची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बेलदार गल्ली, दाळमंडई येथील दर्गाला जाणारा रस्ता बंद करुन, देवस्थानची भिंत तोडून त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गाचा रस्ता बंद करणारा तो दुकानदार दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, दर्गाच्या विश्वस्तांना देखील दमदाटी करुन शहराचे वातावरण दूषित करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर प्रकरणाची तक्रार दिली असून, संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, दर्गाचे विश्वस्त तस्लिम शेख, खालिद शेख, गणेश बागुल, फिरोज (पत्रेवाला) शेख, अंजुम सय्यद, रविंद्र चौधरी, बाळासाहेब काते, सलीम अत्तार आदी उपस्थित होते.
बेलदार गल्ली, दाळमंडई येथे सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या पीर कालाशाह लोहारशाह यांची दर्गा आहे. या दर्गाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. मात्र दर्गा शेजारील एका दुकानदार व त्याच्या मुलाने दर्गाकडे जाणारा रस्ता जाणीवपूर्वक बंद केल्याने येणाऱ्या भाविकांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच या दुकानदाराने देवस्थानची भिंत तोडून त्यावर अतिक्रमण केले आहे. तर राजकीय लोकांना सोबत घेऊन त्याचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकारामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होत असून, दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. तसेच तो दुकानदार दर्गाचे विश्वस्त व चेअरमन यांना दमदाटी करून बाहेरचे गुंड आणून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जाणीवपूर्क जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या दुकानदार व त्याच्या मुलावर कायदेशीर कारवाई करावी आणि दर्गा कडे जाणारा रस्ता खुला करुन दर्गाच्या जागेत झालेले अतिक्रमण हटविण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.