सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम
सहा दिवसीय कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बचत गट बनविणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानच्या (एम.एस.आर.एल.एम.) महिलांसाठी सहा दिवसीय वित्तीय साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली. बचत गटातील महिलांमध्ये वित्तीय जागृती करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेला महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.
सेंट- ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहमदनगर शाखेचे मुख्य प्रबंधक गुलजनान गोहर यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी दोन ते तीन महिलांचा समावेश होता.

बँकेचे मुख्य प्रबंधक गुलजनान गोहर म्हणाले की, ग्रामीण क्षेत्र विकासाठी बचत गट महत्वाची भूमिका बजावत आहे. समाजात वित्तीय साक्षरता निर्माण झाल्यास गावाचा व समाजाचा विकास साधला जाणार आहे. बँकेचा फक्त पैसा कमविणे उद्देश नसून, समाज व महिला आर्थिक संपन्न करणे आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरु आहे. महिला व समाजाच्या सक्षमीकरणातून वेगळा समाधान मिळत आहे. तर बचत गटाचे जाळे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पसरले असून, या बचत गटाच्या माध्यमातून गावाचा आर्थिक विकास साधण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर उपस्थित महिलांना आर्थिक नियोजन व बचती बद्दल मार्गदर्शन केले.

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक अभिनव कुमार म्हणाले की, जीवनात वेळ महत्वाचा आहे. त्याचा उपयोग करून यशस्वी व्हा. योग्य वेळी घेतलेला निर्णय जीवनाला दिशा देतो. आलेल्या संधीचं सोनं करता आले पाहिजे हा संदेश देऊन त्यांनी महिलांना पॅन कार्ड, रुपे कार्ड कंपनी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याची सखोल माहिती दिली. तर बचत गटासाठी असलेल्या बँकेच्या विविध योजनांबद्दल सांगितले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानच्या (एम.एस.आर.एल.एम.) महिलांना प्रमाणपत्र व वित्तीय जागृती करणारे प्रचार फलक व मनोरंजनात्मक खेळाच्या किटचे वाटप करण्यात आले. या महिला आपल्या तालुकास्तरावर बचत गटातील महिलांमध्ये वित्तीय साक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कार्यशाळा संचालक संजीवनी बाद्दल यांनी परिश्रम घेतले.
