शहरातील विद्यार्थ्यांनी मदत घेऊन गाठले श्रीगोंदा येथील अनाथ व भटक्यांचे वस्तीगृह
फराळसह दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप; लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेतील अनाथ व भटक्या समाजातील मुलांना खाऊच्या पैश्यातून दिवाळी भेट दिली. दुर्लक्षीत विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करण्याच्या भावनेने व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदना निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेच्या वतीने हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैश्यातून जमा केलेल्या व काही शिक्षकांच्या आर्थिक सहयोगातून महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिवाळीचे फराळसह दैनंदिन वापरातील साहित्याची किट भेट देण्यात आली. शालेय मित्रांकडून दिवाळीची अनोखी भेट मिळाल्याने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.

दिवाळी हा सण गरीब-श्रीमंत मोठ्या उत्साह व आनंदाने साजरा करतात. मात्र वस्तीगृहातील मुलांचा हा सण आनंदाने साजरा होण्याच्या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सकाळीच तयार होऊन आलेले विद्यार्थी शाळेच्या बसने श्रीगोंदा गाठले. तर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची विचारपूस करुन त्यांना दिवाळी भेट दिली. तर यावेळी त्यांच्यासह गप्पागोष्टी केल्या.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्या छाया काकडे प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, नवनाथ बोडखे, इम्रान तांबोळी, अमित धामणे, प्रदिप पालवे, मंगेश कारखिले, उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, शिल्पा कानडे, सोनाली अनभुले, इंदुमती दरेकर, पुनम धाडगे, वस्तीगृहाचे अनंत झेंडे, विकास पाटील, आश्विनी बारबोले, शुभांगी झेंडे, लता पवार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टी.पी. कन्हेरकर म्हणाले की, आत्मभान जागृत ठेवून समाजात वागणे आवश्यक आहे. हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शाळेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. महान व्यक्तींनी त्यागातून समाज घडविला असून, त्यांचे विचाराने पुढे जाण्यासाठी अशा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी निर्माण करण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, श्रीमंत-गरीब व वरिष्ठ व खालची जात, यामुळे समाजात विषमता पसरलेली आहे. ही विषमता दूर करण्याचे काम शिक्षणातून साध्य होणार आहे. रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना माणसातला देव ओळखून त्या देवाची उपासना करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला आहे. श्रीगोंदा येथील संस्था दुर्लक्षीत घटकांना प्रवाहात आणण्याचे करीत असलेले कार्य कर्मवारींच्या विचाराप्रमाणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी लंके म्हणाले की, लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये मदत करण्याची भावना वृध्दींगत होण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना वस्तीगृहातील जीवन कसे असते? हे प्रत्यक्ष पाहता आले व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट देऊन त्यांच्यात सण साजरा करण्याचा समाधान निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
