• Wed. Nov 5th, 2025

वंचितांच्या दिवाळीसाठी स्नेहालयात दीपोत्सवचे आयोजन

ByMirror

Nov 5, 2023

लायन्स क्लब अहमदनगर, लिओ क्लब व घर घर लंगर सेवेचा उपक्रम

वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी आर्थिक व विविध वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने मागील 16 वर्षांपासून एमआयडीसी येथील स्नेहालय संस्थेत शहरातील वंचित, अनाथ, अपंग, निराधार मुला-मुलींसमवेत दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर व घर घर लंगर सेवेच्या सयुंक्त विद्यमाने 19 नोव्हेंबरला वंचितांचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार असून, यावेळी मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकार, हास्यवीर दिलीप हल्याळ, लायन्सचे माजी प्रांतपाल, डॉ.एस.एस. दीपक, मोहन मानधना, शरद मुनोत, गिरीश मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी 2 वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून, रात्री 8 वाजे पर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. नुकतेच या दीपोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.


आजपर्यंत हे उपक्रम नागरिकांच्या आर्थिक सहयोगातून घेण्यात आले असून, सढळ हाताने मदत करणारे शहरातील किराणा व्यापारी, आडत व्यापारी, आईस्क्रिम विक्रेते आदींसह विविध क्षेत्रातून हातभार लागत आहे. संपूर्ण कार्यक्रमाला सुमारे चार लाख रुपयांचा खर्च असून, शक्य झाल्यास मुलांना नवीन कपडे देखील देण्याचा मानस आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.


आपली दिवाळी आनंदी साजरी करत असताना, वंचितांची दिवाळी देखील गोड करण्याचा हा उपक्रम आहे. वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी या दीपोत्सवाला हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक मदतीचा धनादेश लायन्स क्लब ऑफ अहमदनगर या नावाने किंवा वस्तू स्वरुपात व व्यक्तिगत स्वरुपात उपहार, मिठाई, फटाके देण्याचे आवाहन अध्यक्ष धनंजय भंडारे, सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत यांनी केले आहे.


या दीपोत्सव कार्यक्रमात वंचित मुला-मुलींसाठी मेहंदी, टॅटू, घोडागाडी राईड, जम्पिंग पॅड, मेरी गो राऊंड असे विविध खेळ तर पॉपकॉर्न, बुढ्ढी के बाल व मिष्टान्न भोजनाचा समावेश आहे. विविध प्रकारचे कार्टून या मेळाव्यात मुलांचे मनोरंजन करणार आहे. मुलांना धमाल करण्यासाठी डी.जे. व झुंबा डान्सचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.


कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पाच हजार दिवे प्रज्वलित करुन परिसर उजळविण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मुलांना चॉकलेट, आईस्क्रिम व इतर खाऊंचे वाटप करुन सोडत पध्दतीने बक्षीसांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमात स्नेहालय, बालभवन व इतर संस्थांचे मुले सहभागी होणार असून, त्यांच्यासाठी किल्ले बनवा, एक मिनिट व चित्रकला स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे. समारोपप्रसंगी सामुहिक नृत्य, फटाक्यांची आतषबाजी व आकाश दिवे सोडून हा दीपोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुलांना मिष्टान्न भोजन देऊन फराळचे वाटप केले जाणार आहे.


हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रकल्पप्रमुख हरजितसिंह वधवा, लिओ अध्यक्ष आंचल कंत्रोड, सचिव धारावी पटेल, खजिनदार अरमान खंडेलवाल, प्रकल्प प्रमुख हरमनकौर वधवा, युक्ती देसर्डा, प्रशांत मुनोत, आनंद बोरा, सतीश बजाज, स्नेहालयचे हनीफ शेख, संधान ढालगुडे, किरण भंडारी, सुनिल छाजेड, डॉ. अमित बडवे, डॉ. संजय असनानी, घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, सुनील थोरात, गुलशन कंत्रोड, राजू जग्गी परिश्रम घेत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क धनंजय भंडारे 9403961599, हरजिततसिंह वधवा 9423162727 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *