पैसे न देता खरेदी खतावर घेतल्या सह्या; जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
राहते घर व शेतजमीनीचा ताबा सोडण्यासाठी सावकारचे धमकी सत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून भाळवणी येथील शेतकरी दांपत्य मंदा लोंढे व राजेंद्र लोंढे यांनी सोमवारी (दि. 6 नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे जामगाव येथील त्या सावकारी शेठ विरोधात तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे. मुलाने घेतलेल्या कर्जापोटी मोठी रक्कम परत देऊन देखील शेत जमीनीवर सावकाराचा डोळा असून, तो सावकार रात्री-अपरात्री घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप शेतकरी दांपत्यांनी केला आहे.
मंदा लोंढे व राजेंद्र लोंढे यांच्या मुलाने आई-वडिलांच्या गैरहजरित जामगावच्या सावकारी शेठजीकडून 10 लाख रुपये 10 टक्के व्याजदराने घेतले होते. व्याजासह पूर्ण पैसे परत करुन देखील तो 50 लाख रुपये मागणी करत होता. परंतु वेळोवेळी त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैसे व काही रक्कम रोख देण्यात आली. सावकार हा वाळूतस्कर असून, गुंड स्वरूपाचा आहे. तो दादागिरी करून पुन्हा वाजवी पैशाची मागणी करुन दहशत पसरवित असल्याचे लोंढे दांपत्यांनी स्पष्ट केले आहे.
इतर नातेवाईकांकडून 34लाख 50 हजार रुपये सावकाराला देण्यात आले तरी, देखील त्याने भाळवणी येथील गट नंबर 775 मधील संपूर्ण दोन एकर नऊ गुंठे जमीन स्वतःच्या नावावर करुन घेतली आहे. या जमिनीचे 53 लाख रुपये किंमत मध्यस्तीच्या साक्षीने ठरले होते. 18 लाख 50 हजार रुपये सातबारा तयार झाल्यावर 21 दिवसांनी तुम्हाला दिले जातील अशी कबुली त्या सावकाराने मध्यस्तीला कबूल केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून खरेदी खतावर सह्या करण्यात आल्या. मात्र त्याने सदरची रक्कम न देता आमची शेत जमीन व राहते घर खाली करण्यासाठी धमकी सत्र सुरु करुन त्रास देत असल्याचा आरोप लोंढे दांपत्यांनी केला आहे.
अवाजवी पैसे वसुल करुन राहते घर व शेत जमीन बळकाविण्याचे काम करणाऱ्या त्या सावकार विरोधात खासगी सावकारकी प्रतिबंधक कायदे अंतर्गत कारवाई करण्याची मागणी लोंढे यांनी केली आहे.