मनपा आयुक्तांना निवेदन; रास्ता रोकोचा इशारा
प्रभाग 8 मधील ते रस्ते बनले नागरिकांसाठी धोकादायक
अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील प्रभाग 8 मधील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी बाळासाहेब वाघमारे, संदीप घोरपडे, अक्षय गवळी, क्षीरसागर, मंदा शिंदे, मंगल खरात, वंदना खंडागळे, चंद्रकला त्रिभान, सुमन गुंजाळ, मीना गायकवाड, विमल बोरुडे, मुक्ताबाई गर्जे, शीला देठे, संगीता रोमन, जयश्री शिंदे, रशीद शेख आदींसह नागरिक उपस्थित होते.
अनेक वेळा निवेदन देऊन देखील रस्ता दुरुस्तीचे काम होत नसल्याने नागरिकांनी 11 नोव्हेंबर रोजी नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. बोल्हेगाव येथील चैतन्य क्लासिक हॉटेल ते रेणुका नगर, रेणुका नगर ते गांधीनगर, गांधीनगर ते मारुती मंदिर, मारुती मंदिर ते पिंबळकचा आडवा रोड रस्ता पावसाने खराब झालेला आहे.
या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असते. रस्त्यावरील लहान-मोठे खड्डयांमुळे रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. या खराब रस्त्यावरुन येण्या-जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना देखील या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीच्या फुफाट्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्त्यावरुन जीव मुठीत धरुन नागरिकांना जावे लागत आहे. सातत्याने अपघात होत असल्याने हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनला असल्याने तातडीने बोल्हेगाव येथील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.