हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
आतषबाजीने उजळला परिसर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विजयादशमी निमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंचवीस फुटी रावणाचे दहण करण्यात आले. रावण दहणानंतर अर्धा तास चाललेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रावण दहणचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी हजारोंच्या संख्येने देवस्थानच्या मैदानात गर्दी केली होती.

रावण दहण करताच भाविकांनी बोलो सियाराम चंद्र की जय….चा एकच गजर केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी मंदिरात रेणुकामातेची आरती करण्यात आली. हलगी-संबळाच्या पारंपारिक वाद्याच्या गजरात अश्वांसह मंदिर परिसरातून मिरवणुक काढण्यात आली होती. मंदिरा समोरील मैदानात रावणाचे दहण करण्यात आले. रावण दहणानंतर भव्य स्वरुपाच्या आतषबाजीने संपूर्ण परिसरासह आकाश लखलखाटून गेला होता.
शिस्त व नियोजनबध्द कार्यक्रमांचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटून विजयादशमीचा उत्सव साजरा केला. दुपारी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्रोत्सव भव्य स्वरुपातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी पार पडला.

