लेक वाचवा लेक शिकवाचा संदेश देत मुलींचे पूजन
सांस्कृतिक वारसा जपत असताना विज्ञानवादी विचाराची सुद्धा जोपासना -प्रा. प्रसाद जमदाडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस व लंडन किड्स फ्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने लेक वाचवा लेक शिकवा अभियान राबवण्यात आले. मुलींचे दुर्गामाता पूजन व देवीचा तांडव हे दोन कार्यक्रम उत्साहात पार पडले. या उपक्रमातंर्गत लेक वाचवा लेक शिकवाचा संदेश देत दोनशे मुलींचे पूजन करण्यात आले.
देवीच्या नऊ अवतारांबरोबरच सध्याच्या काळातील डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील, जिल्हाधिकारी, नर्स यांसारख्या वेशभूषा केलेल्या मुलींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. मुलींनी लेक वाचवा लेक शिकवा यावर व्याख्यान देऊन मुलींना येणाऱ्या काळात शिक्षण देणे किती गरजेचे आहे? याचे महत्त्व पटवून दिले.
संस्थेचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे म्हणाले की, स्त्रीभ्रूणहत्या थांबविणे आणि मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येणे यासाठी एक आगळावेगळा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला. मुलीचे महत्त्व सर्व समाजापर्यंत पोहोचवणे तसेच प्रत्येक पालकांनी मुलीच्या बाबतीत सकारात्मक विचार करणे ही काळाची गरज आहे. सांस्कृतिक वारसा जपत असताना आम्ही विज्ञानवादी विचाराची सुद्धा जोपासना या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली. काही मुलींनी देवीचे विविध रूपे साकारले तर काही मुलींनी आजच्या कर्तृत्ववान स्त्रीचे रुपांचे दर्शन घडविले असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रा. शाहरुख शेख, प्रा. रुचिता जमदाडे, प्रा. शबाना शेख, प्रा. निशिगंधा गायकवाड, प्रा. कल्याणी शिंदे, प्रा. सुप्रिया मुळे, प्रा. सपना साबळे, प्रा. पुजा जाधव, प्रा. सुवर्णा दाणी, प्रा. रणखांब, मिना गायकवाड आदींसह विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
