विविध क्षेत्रात निस्वार्थपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित
हुंडा घेणार नाही व देणार नाही! या विचाराने घेतलेला वधू-वर मेळावा समाजाला दिशा देणारा -रुपालीताई चाकणकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलीला स्वत:च्या पायावर उभे करुन तिला कर्तुत्व सिद्ध करू द्या. मुलींच्या लग्नासाठी बाजाराच्या घोड्यावर तिचा लिलाव होऊ देवू नका. मुलगी कर्तुत्ववान, सक्षम व आर्थिक संपन्न झाल्यास तिच्यावर अन्याय करण्याचे धाडस कोणाचे होणार नसल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले. तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन हुंडा घेणार नाही व देणार नाही! या विचाराने घेतलेला वधू-वर मेळावा समाजाला दिशा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, 22 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. जनवार्ता, जय युवा अकॅडमी, माळी महासंघ, श्री संत सावता माळी युवक संघ, फिनिक्स सोशल फाउंडेशन, समृद्धी महिला संस्था, रयत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वधु-वर परिचय मेळाव्याप्रसंगी चाकणकर बोलत होत्या.

माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, प्रा. माणिक विधाते, जनवार्ताचे पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, माळी महासंघाचे गणेश बनकर, प्रा. सिताराम जाधव, शेखर होले, नितीन डागवाले, ॲड. सुनिल महाराज तोडकर, मंगल भुजबळ, नगरसेविका वंदनाताई ताठे, जयश्री शिंदे, ज्योती व्यवहारे, संजय फुलसौंदर, प्रयागाताई लोंढे, जयश्री व्यवहारे, राजेंद्र झोडगे, सुभाष गोंधळे, नंदकुमार नेमाने, संदीप दळवी, जालिंदर बोरुडे, उषा चौरे, दिनेश शिंदे, अविनाश शिंदे, जयेश शिंदे, संभाजी कोकाटे, सविता बनकर आदींसह माळी समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा विचार जगवायचा असेल तर त्यांनी आचरणात आणलेले कृत्य व विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांना हातभार लावावा लागेल. सावित्रीबाई फुले यांनी सर्व महिलांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यामुळे सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मात्र आजही सावित्रीच्या लेकीवर अन्याय अत्याचार होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला आयोग पुरुषांविरोधात नाही, महिलांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करत आहे. कुटुंब म्हणजे काय? सर्व एकत्र येतात तेच कुटुंब. विभक्त कुटुंब व्यवस्थेत कुटुंब संस्था टिकली तर समाजव्यवस्था टिकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्यवानाची सावित्री कोणी पाहिली नाही. मात्र त्या सावित्रीसाठी वटपौर्णिमेला उपवास धरला जातो, वडाच्या झाडाला सात फेरे मारले जातात. मात्र ज्या ज्योतिबाची सावित्री सगळ्यांनी पाहिली तिच्यासाठी आराधना करण्याची गरज आहे. महिलांनी उपवास आराधना करताना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.

प्रास्ताविकात ॲड. महेश शिंदे यांनी माळी समाज संपूर्ण महाराष्ट्रात उद्योग-व्यवसाय निमित्त विखुरला गेला आहे. आधुनिक काळात प्रत्यक्ष गाठीभेटीचे प्रमाण कमी झाल्याने मुला-मुलींचे विवाह जुळविण्यास अडचणी येत आहे. तर घटस्फोटीत, विधवा, विधूर, दिव्यांग, विना आपत्य-आपत्य अशा इतर अनेक कारणांनी योग्य जोडीदार न मिळाल्याने अनेक कुटुंबांना विवाहाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून, या वधु-वर मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. स्वाती सुडके, कवियत्री विद्या भडके, सामाजिक कार्यकर्ते अशोक भालके महेश भनभने, गणेश बनकर, विठ्ठलराव होले यांना रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. या वधु-वर मेळाव्यास जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून समाज बांधव एकवटला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुनिल महाराज तोडकर यांनी केले. आभार मंगल भुजबळ यांनी मानले.
