• Mon. Jan 26th, 2026

श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या रक्तदान शिबिराला देवी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Oct 22, 2023

सात दिवस घेतला भाविकांनी आरोग्य शिबिराचा लाभ

सामाजिक बांधिलकीने प्रत्येकाने रक्तदान चळवळीत योगदान द्यावे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास युवकांसह देवी भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर भाविकांसाठी सात दिवस विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा देखील भाविकांनी लाभ घेतला.


रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, नगरसेवक बाळासाहेब पवार, सुनिल त्र्यंबके, विश्‍वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.


दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंदिरा समोरील मैदानात झालेल्या रक्तदान शिबिरासाठी अहमदनगर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. प्रारंभी रेणुका मातेची आरती करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून आहे. कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. आजही हा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक समाजातील युवकांनी सामाजिक जाणीव ठेऊन रक्तदान करण्याची गरज आहे. काही दुर्घटना घडल्यास रक्तदाता हा त्या गरजू व्यक्तीचा जीवदाता ठरतो. सामाजिक बांधिलकीने प्रत्येकाने रक्तदान चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्रभाकर भोर म्हणाले की, श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून शारदीय नवरात्रोत्सव सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. भाविक व महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी विविध आरोग्य शिबिर घेण्यात आले. दर्शनाला येणाऱ्या हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


तसेच ट्रस्टच्या वतीने विष्णू दश अवतार या नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. या नाटिका पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नाटिकेतील कलाकारांनी पौराणिक कथेवर सादर केलेल्या नाटिकेला भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *