मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई
राजवाड्याची कमान व रंगेबिरंगी कारंजा ठरला लक्षवेधी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रनिमित्त मंदिरात भाविकांची मांदियाळी वाढली आहे. तर ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्यक्रमासह विविध सामाजिक उपक्रम सुरु आहे.

मंदिराला जाण्यासाठी भव्य राजवाड्याची प्रतिकृती असलेली कमान उभारण्यात आली असून, त्याच्यासमोर रंगेबिरंगी कारंजा भाविकांचे लक्ष वेधत आहे. तर मंदिराकडे जाणारा रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई झगमगाट झाला आहे. मंदिरा समोरील मैदान विविध पाळणे थाटले असून, भाविकांसह बालगोपाळ या पाळण्याचा आनंद घेत आहे. तर विविधे खाद्य पदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळण्यांचे व महिलांच्या विविध साहित्यांचे स्टॉलने परिसर गजबजला आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले असून, भाविक नवरात्रच्या पहिल्या माळेपासूनच मोठी गर्दी करत आहे.

पंचक्रोशीतील हजारो भाविक दररोज दर्शनाला हजेरी लावत असून, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतं आहे. संध्याकाळी आरती व दर्शनाला मोठी गर्दी होत आहे. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिरात भाविकांची मोफत सर्व रोग निदान शिबिर, जर्मन मशीनद्वारे शारीरिक तपासणी, मोफत स्त्री रोग तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंगळवारी (दि.24 ऑक्टोबर) संध्याकाळी रोजी दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, रावण दहन होणार आहे. तर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे.
तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी एक हजार एक महिला दुर्गा समआष्टी पाठ करणार आहे. या सर्व उपक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी परिश्रम घेत आहे.

