एम.एस.एम. ई विकास आणि सुविधा कार्यालय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचा संयुक्त उपक्रम
प्रदर्शन सर्वांसाठी खुले; उद्योजकांना भेट देण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एम.एस.एम. ई विकास आणि सुविधा कार्यालय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर या औद्योगिक संस्थेच्या वतीने 17 व 18 ऑक्टोबर रोजी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या औद्योगिक उत्पादनांचे प्रदर्शन तसेच विक्रेता विकास होण्याकरिता प्रदर्शन आणि माहिती व्याख्यानचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, उद्योजकांना भेट देण्याचे आवाहन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी केले आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील संजोग लॉन येथे मंगळवारी (दि.17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएसएमईचे (मुंबई) सहाय्यक संचालक अभय दप्तरदार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नव उद्योजकांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने भारतीय संरक्षण क्षेत्रात काम करणारे प्रादेशिक तंत्रज्ञान नोड, हेड कवाटर्स सदर्न कमांड, माझगाव डॉक लिमिटेड, टाटा नेक्सार्क, श्नायडर इलेक्ट्रिक, सी.जी. पॉवर ॲण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमिटेड, इंडियन सिमलेस मेटल ट्युबस लिमिटेड, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांसारख्या नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी हे व्हेंडर डेव्हलपमेंट विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच या कार्यक्रमात एम.एस.एम.ई.चे संचालक ए.आर. गोखे, अरविंद पारगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे, क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे इंद्रनील धनेश्वर, एम.सी.सी.आय.ए. चे महासंचालक प्रशांत गीरबने मार्गदर्शन करणार आहेत. समारोपीय कार्यक्रमात सुहास झेंडे, जयेश बरोट, विनोद अग्रवाल हे उद्योजकांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्रदीप बागुल यांच्याशी संपर्क 9665572544 साधण्याचे सांगण्यात आले आहे.
