• Thu. Oct 30th, 2025

टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या कार्यशाळेस युवकांसह ग्रामस्थांचा प्रतिसाद

ByMirror

Oct 7, 2023

ग्रामविकासाचा कणा हा गावातील नैसर्गिक संसाधन -अश्‍विनीकुमार पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामविकासाचा कणा हा गावातील नैसर्गिक संसाधन आहे. या संसाधनाचा उपयोग योग्य पद्धतीने व शास्त्रीय दृष्टीकोनातून केला तरच गावे समृद्ध होतील, असे प्रतिपादन टाटा पॉवर रिन्युएबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्‍विनीकुमार पाटील यांनी केले.


टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय निवासी कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी अश्‍विनीकुमार पाटील दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्स) माध्यमातून बीज भाषणात भावना व्यक्त केली. तर टाटा समूहाने आतापर्यन्त सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली.
भारतीय उद्योग क्रांतीचे जनक जमशेदजी टाटा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टाटा पॉवरचे महादेव साबळे, विश्‍वास सोनवले, सागर उशीर, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे फादर जॉर्ज दाब्रिओ, दत्तात्रय गायकवाड, संदिप बेरड, भुजलतज्ञ श्रीकांत मौर्य आदींसह सरपंच, शेतकरी, महिला उपस्थित होते.


या कार्यशाळेसाठी टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट काम करीत असलेल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या प्रातिनिधिक प्रतिनिधी उपस्थित होते. टाटा पॉवर पवन उर्जा विभागाचे मुख्य कार्यकारी परेश सहस्त्रबुद्धे ह्यांनी टाटा पॉवर ने जलसंवर्धन व महीला सक्षमीकरणाच्या झालेल्या कामामुळे होत असलेला सकारात्मक विकासाची त्यांनी माहिती दिली.
महादेव साबळे यांनी टाटा समूहाने केलेल्या कामांची माहिती देऊन पवन उर्जा व सौर ऊर्जाचे होत असलेले फायदे सांगून समाजाने अशा अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पची निर्मिती करणे कामी समाजाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.


प्रास्ताविकात बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज ह्यांनी तीन दिवसात होणाऱ्या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध विषय मांडले जाणार आहे. यामध्ये भूजल व्यवस्थापन व संवर्धन, सुशासन, पाण्याचा ताळेबंद, ग्रामस्तरीय नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन समितींची बांधणी, सेंद्रिय शेती व आंतरपीक व्यवस्थापन तसेच विविध कृषी विभागाशी संलग्न शासकिय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


तीन दिवसीय कार्यशाळा शिबिरात विविध विषयावर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. भूजल तज्ञ श्रीकांत मौर्या, यशदाचे प्रशिक्षक अशोक सब्बन, आत्माचे अधिकारी उमेश डोईफोडे, जिल्हा ग्राम विकास विभागाचे दत्ता उरमुडे, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. रणसिंग आदी मार्गदर्शन करणार आहेत. सोलापूर, सांगली, जालना, धाराशिव, बीड, सातारा, अहमदनगर इत्यादी ठिकाणाहून आलेल्या प्रतिनिधिना मार्गदर्शन मिळणार आहे.


या कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थी राळेगणसिद्धी, हिवरे बाजार व नगरमधील टाटा पॉवरच्या आर्थिक सहकार्याने आणि बॉस्को ग्रामीण विकास केंद्राने अंमलबजावणी केलेल्या कामांची पाहणी करणार आहेत. या कार्यशाळेत बचत गटाच्या महिला, सरपंच, सदस्य, पाणलोट विकास समितीचे पदाधिकारी, सुजाण ग्रामस्थ व युवकांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *