युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी आकाश दंडवते उर्फ चिंट्या (रा. सावेडी) यांचा जामीन जिल्हा न्यायालयाने पुन्हा फेटाळला. वैद्यकीय कारण देऊन ठेवण्यात आलेल्या जामीन अर्जावर वैद्यकीय तपासणीचे अहवाल सादर करण्यात न आल्याने जिल्हा न्यायालयाकडून आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
योगेश गलांडे यांना 13 मार्च रोजी एमआयडीसी येथे आकाश दंडवते व त्यांचा मोठा भाऊ किरण दंडवते यांनी कंपनीतील व्यवहाराच्या वादातून जीवघेणा हल्ला करुन जबर मारहाण केली होती. जीवघेणा हल्लाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला 20 मार्च रोजी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी आकाश दंडवते उर्फ चिंट्या याने मुतखडा व मुळव्याध असल्याचे वैद्यकीय कारण देऊन जामीनाचा अर्ज ठेवला होता.
यावर न्यायालयाने 7 दिवसात संबंधित आजाराच्या चाचण्याचे अहवाल सादर करण्याचे 26 सप्टेंबर रोजी आदेश दिले होते. मात्र आरोपीकडून सदर तपासण्याचे अहवाल सादर न झाल्याने न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी दंडवते याचा जामीन फेटाळला आहे. सरकारी पक्षाकडून ॲड. केदार केसकर व गलांडे यांच्या वतीने ॲड. विवेक म्हसे, ॲड. सागर वाव्हळ यांनी काम पाहिले.