• Wed. Oct 29th, 2025

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनची निदर्शने

ByMirror

Oct 2, 2023

मैत्रेय कंपनीच्या प्रॉपर्टी विक्रीतून गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याची मागणी

आर्थिक बिकट परिस्थितीमुळे गुंतवणुकदार आत्महत्येच्या मार्गावर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याच्या मागणीसाठी मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने सोमवारी (दि.2 ऑक्टोबर) महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त शहरातील वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मच्छिंद्र निकम, रामचंद्र ठोंबरे, रमेश तावरे, शोभा वाघ, शरद जाधव, अशोक नागरे, अरुण कोरडे, मिरा केदार आदींसह गुंतवणुकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


महाराष्ट्रासह देशातील 2 कोटी 16 लाख ग्राहकांचे मैत्रेय सर्व्हिसेस प्रा.लि., मैत्रेय प्लॉटर्स ॲण्ड स्ट्रक्चरर्स, मैत्री रियल्टर ॲण्ड कन्स्ट्रक्शन, मैत्री सुवर्णसंधी या चार कंपन्यांमध्ये तब्बल 2600 कोटी रुपये अडकून आहेत. फेब्रुवारी 2016 पासून कंपनीवर गुन्हे दाखल होऊन कंपनी बंद झालेली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामधील आरोपी संचालक लक्ष्मीकांत नार्वेकर, विजय तावरे या दोघांनाच आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात हजर करून चार्जशीट दाखल केले. मुख्य आरोपी वर्षा मधुसूदन सत्पाळकर या फरार आहेत. तसेच जनार्दन परुळेकर हेही परभणी येथील कारागृहात आहे. या दोघांना अहमदनगर पोलीसांनी अटक केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


कंपनीने 2016 पासून ग्राहकांचा परतावा देणे बंद केले आहे. गुंतवणुकीची रक्कम व परतावा मिळत नसल्याने गुतवणुकदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने काही महिला, पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. कंपनीसाठी पैसे जमा करणारे प्रतिनिधी वर्गाला देखील समाजात वावरताना समस्या निर्माण झाल्या असून, त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात जाता येत नाही.

गुतवणुकदारांची शिवीगाळ, धक्काबुक्की सहन करावी लागत आहे. न्यायालयीन प्रक्रियेत हे प्रकरण अडकल्याने गुंतवणुकदार व प्रतिनिधी यांची दिवसंदिवस मानसिकता बिघडत चाललेली. देशभरातील गुतवणुकदार व प्रतिनिधी यांना न्याय मिळण्यासाठी शासन, प्रशासनाने गंभीर विचार करुन गुतवणुकदारांच्या रकमा परत मिळण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.


कंपनीची संपूर्ण प्रॉपर्टी एमपीआयडी ॲक्टनुसार महाराष्ट्र शासनाने जप्त केलेली असून, ज्या प्रॉपर्टीची अडचण नसेल अशा प्रॉपर्टीची लवकरात लवकर विक्री करून ते पैसे शासनाने उघडलेल्या एस्क्रो खात्यात जमा करून ग्राहकांचा परतावा परत द्यावा, कंपनीच्या सीएमडी वर्षा सत्पालकर 45 दिवसानंतर नाशिक कोर्टाकडून जामिनावर सुटून आल्या असून, इतर गुन्ह्यांमध्ये फरार असताना त्यांना लवकरात लवकर अटक करावी, मैत्रीय प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी जलद गती न्यायालयात चालवावा, सरकारकडून एक चांगला कायदे तज्ञ सरकारी वकील नेमण्यात यावा, नेमलेले सक्षम अधिकारी व असोसिएशनच्या पदाधिकारी यांची तातडीने मंत्रालयात बैठक घेऊन प्रकरण निकाली काढण्यासाठी चर्चा व्हावी, या प्रकरणात विलंब होत असल्यास गुंतवणूकदार यांच्या परताव्यासाठी विशेष तरतूद करून परतावा द्यावा, मैत्रेय प्रतिनिधींवर ज्या ठिकाणी गैरसमजुतीतून गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *