स्वच्छता हीच सेवा उपक्रमातंर्गत राबविले स्वच्छता अभियान
समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता हीच खरी सेवा ठरणार -शफाकत सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना व्यावसायिक प्रशिक्षणाचे धडे देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या जनशिक्षण संस्थेच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.1 ऑक्टोबर) सकाळी स्वच्छता हीच सेवा उपक्रमातंर्गत शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात महिला व युवतींनी सहभागी होवून निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संदेश देऊन कचरामुक्त भारताचा नारा दिला.

संस्थेचे अध्यक्ष राहुल गुंजाळ व संचालक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नालेगाव व नेप्ती नाका चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सहभागी झालेल्या महिला व युवतींनी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. सकाळी 10 ते 11 या एका तासात परिसरात झाडू मारुन, प्लास्टिक, कागद व इतर कचरा जमा करुन परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, लेखापाल अनिल तांदळे, मंगल चौधरी, माधुरी घाटविसावे, उषा देठे, विजय बर्वे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शफाकत सय्यद म्हणाले की, प्रत्येकाने देशासाठी योगदान व सेवा देण्याची गरज आहे. समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता हीच खरी सेवा ठरणार आहे. प्रत्येकाने योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल तांदळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला बळकटी देण्यासाठी आणि नागरिकांना शाश्वत स्वच्छता सेवा प्रदान करण्यासाठी लोकांना एकत्रित करुन एक वेगवान राष्ट्रव्यापी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगल चौधरी यांनी समाजात स्वच्छतेची गरज त्याच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली. माधुरी घाटविसावे यांनी पर्यावरणाला घातल ठरत असलेल्या प्लास्टिकमुक्तीचा संदेश देवून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केले.
