महिला शिक्षिकांचे छळ व गैरकारभारप्रकरणी खांडगावच्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एक वर्षांपासून विभागीय चौकशी प्रस्तावित ठेवलेल्या व महिला शिक्षिकांनी छळ प्रकरणी तक्रार केलेल्या खांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय झरेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागा समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तर महिलांना त्रास देणाऱ्या त्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खांडगाव (ता. पाथर्डी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पीडित शिक्षिकांनी पोलीस अधीक्षक व महिला आयोग यांच्याकडे मुख्याध्यापकाच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार केलेली आहे. त्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे. राजकीय निवडणुकीत सहभाग घेऊन वृत्तपत्रात राजकीय बातम्या देणे, बदलीसाठी चुकीची कागतपत्रे सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक, ग्रामपंचायतच्या प्रशासकीय लेटरपॅडचा प्रशासकीय नोंद न करता गैरवापर, प्राथमिक शाळा खांडगावचा बनावट शिक्का वापरून त्यात खाडाखोड, माध्यमिक शिक्षण संस्था, जिल्हा परिषद यांना बनावट सह्यांचे संदर्भ/पुरावे सादर करून उपोषणाची नोटीस, विद्यार्थी पटसंख्या ऑनलाईन शून्य असताना शालेय पोषण आहार आणि गणवेशासाठी खर्च करण्याचे गैरवर्तन खांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक करत असल्याचा आरोप झरेकर यांनी केला आहे.
याबाबत सबळ पुरावे देऊन सुद्धा काही गैरप्रकाराबद्दल फौजदारी कारवाईची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी करुन देखील त्याकडे दुर्लक्ष करून एक वर्षांपासून फक्त विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्यातही विलंब होत आहे.
प्राथमिक शिक्षण अधिकारी सदर मुख्याध्यापकाला पाठिशी घालत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑनलाईन पटसंख्या भरताना झालेल्या गंभीर चुकीबद्दल लोहसर (ता. पाथर्डी) येथील मुख्याध्यपकांना निलंबित केले आहे. अशाच स्वरूपाची गंभीर तक्रार आणि इतर आरोप पुराव्यासहित केले असताना खांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला सुट दिली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संबंधीत मुख्याध्यापकाचे तात्काळ निलंबन करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन झरेकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
