• Wed. Oct 29th, 2025

देशातील बँका मधील लाखो रिक्त जागा भरा

ByMirror

Sep 28, 2023

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची 1 ऑक्टोबर पासून देशव्यापी आंदोलनाची हाक

विविध सरकारी योजना व बँक व्यवहाराच्या ताणामुळे कर्मचारी त्रस्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील बँकामध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पुरेश्‍या प्रमाणात नोकर भरती करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने 1 ऑक्टोबर पासून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन उतरणार असून, अहमदनगर जिल्ह्यातून देखील बँक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


2019 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा व्यवसाय 147 लाख कोटी रुपये होता. ज्यावेळेस बँकेत क्लर्क 2.95 लाख तर शिपाई 1.24 लाख होते. 2023 मध्ये हा व्यवसाय 204 लाख कोटी रुपये झाला आहे. तर क्लर्कची संख्या 2.55 लाख आणि शिपाई 1.1 लाख झाली आहे. व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला मात्र कर्मचारीची भरती न केल्याने ते पद रिक्त होवून संख्या कमी झाली आहे. सरकार आपल्या सर्व योजना बँकांच्या माध्यमातून राबवित आहे. यामध्ये जीवन ज्योती, जीवन सुरक्षा, अटल पेन्शन, पिक कर्ज, पिक विमा, मुद्रा, स्वनिधी, विश्‍वकर्मा या योजनांचा समावेश आहे. याशिवाय निश्‍चलनीकरण असो व जीएसटी अथवा करोनाच्या काळात राबविण्यात आलेल्या योजना गरीब कल्याणा व किसान कल्याण योजना सर्व योजनांच्या अंमलबजावणीचा भार बँकावर टाकण्यात आला आहे.


सर्व कामाचा बोजा लक्षात घेता बँकेत ताबडतोब क्लार्क आणि शिपाई वर्गाच्या किमान दोन लाख रिकाम्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे. बँकेतील नित्याची कामे सध्या बँक तात्पुरत्या कंत्राटी आऊट सोर्स कर्मचाऱ्यांकडून करून घेत आहे. अशा सर्व अस्थाई कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे असा संघटनेचा आग्रह आहे. पुरेश्‍या कर्मचारी संख्ये अभावी ग्राहक सेवेवर देखील विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


या आंदोलनाचा एक भाग म्हणून संघटनेतर्फे व्यापक जन अभियान हाती घेण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या आखेरीस लोकसभेवर एक मोर्चा, 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर बँक निहाय तर 2 जानेवारी ते 6 जानेवारी राज्यनिहाय संप (महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी 3 जानेवारी) आणि 19 तसेच 20 जानेवारी रोजी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्यात देशभरातील सर्व सार्वजनिक तसेच जुन्या जमान्यातील खाजगी क्षेत्रातील साठ हजारावर शाखेतून काम करणारे तीन लाखावर बँक कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.


सरकारी एकीकडे रोजगार मेळावे घेत आहे, तर दुसरीकडे कायमस्वरूपी रोजगार हिसकावून घेत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या जोरावर बँका मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत, त्यांचा कायमस्वरूपी रोजगार हिसकाविला असून, त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. दरम्यान सरकारने नोकर भरतीच्या प्रश्‍नावर काही ठोस प्रस्ताव दिला नाही, तर फेब्रुवारी 2024 पासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *