झाडांच्या लिलावाच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- झाडांच्या लिलावाची रक्कम ग्रामपंचायत खात्यावर वर्ग न करता गैरव्यवहार केल्याचा आरोप करुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने मौजे कासारे (ता. पारनेर) ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे यांना दिले.
पारनेर तालुक्यातील कासारे ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या पाझर तलाव क्रमांक एक मधील झाडाचा लिलाव 20 जून 2022 रोजी झाला होता. कासारे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून ती शासकीय रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमा केली नाही. बोलीप्रमाणे लिलावातील नियमानुसार 50 टक्के रक्कम खात्यावर जमा करणे बंधनकारक असताना खात्यावरती रक्कम जमा झालेली नाही.
सदरप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य शंकर कासुटे यांनी या गैरव्यवहार विरोधात आवाज उठवून उपोषण केले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती पारनेर यांनी विस्तार अधिकारी यांना तक्रारीची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल देण्यात यावा असे आदेश होऊनही आज अखेर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. येत्या पंधरा दिवसात संबंधितांवर अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल न झाल्यास नाशिक विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
