गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर
अंधश्रध्देच्या आहारी न जाता शिक्षणाची कास धरावी -रमेश त्रिमुखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यामध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे आजीव सभासदांच्या उपस्थितीत सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे रमेश त्रिमुखे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. संस्थेचे सचिव प्रकाश कोकणे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब त्रिंबके यांनी संस्थेला काम करण्यासाठी समाजाने पाठबळ देण्याचे आवाहन केले. या सभेत संस्थेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. मनीषा केलगंद्रे यांनी कायदेशीर बाबीवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात समाजातील इयत्ता दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रमेश त्रिमुखे यांनी इयत्ता दहावी व बारावी मधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सैनिक दलितमित्र कै. काशिनाथ किसन त्रिमुखे व कै. शेवंताबाई काशिनाथ त्रिमुखे यांच्या स्मरणार्थ रोख रकमेचे पारितोषिक दिले.

रमेश त्रिमुखे म्हणाले की, अंधश्रध्देच्या आहारी न जाता शिक्षणाची कास धरावी. शालेय जीवनात ध्येय निश्चित करुन त्या दिशेने जिद्द व कष्टाने वाटचाल करण्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे ऑडिटर सुनिल कुलट यांनी मंडळाला समाजाने पाठबळ देवून संस्था मोठी कशी होईल? या विषयी मार्गदर्शन केले. अश्विनी सुनिल कुलट सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीए कुलट व ऑडिटर विजय त्र्यंबके यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी तुळशीराम बोराडे, गंगाधर त्र्यंबके, अंबादास केळगंद्रे, संतोष सोनटक्के, राजेंद्र शिंदे, प्रकाश शिंदे, लक्ष्मणराव नारद, भानुदास हसनाळे, यशवंत हसनाळे, राजु त्रिंबके, संतोष कवडे, विवेक त्र्यंबके, राजेंद्र कटके, शुभम कटके, आशाताई बोराडे, आरती बोराडे, कुसुम नारद आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष बोराडे यांनी केले. आभार सुरेंद्र बोराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अनिल त्रिमुखे, संजय कवडे, पिंटू कोकणे, गणेश नारायणे, प्रशांत डहाके, संजय खरटमल, विनोद इंगळे, प्रविण त्र्यंबके, ओमप्रकाश कवडे यांनी परिश्रम घेतले.