राहत्या घराची नोंद जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून लावणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- राहत्या घराची नोंद जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून लावणाऱ्या विरोधात कारवाई करुन न्याय मिळण्यासाठी पानोली (ता. पारनेर) ग्रामपंचायत येथील सैनिक पत्नीने जिल्हा परिषद समोर स्वाती भरत गायकवाड व संजना गायकवाड यांनी उपोषण केले.
पारनेर तालुक्यातील पानोली ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या गावठाण हद्दीतील गट नंबर 739 मधील घराची नोंद ग्रामसेवक, सरपंच यांनी जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून नोंद लावली आहे. त्याच गटामध्ये एका महिलेची नोंद पदाचा गैरवापर व अर्थपूर्ण संबंध ठेवून मालकी हक्काची लावण्यात आली आहे. एकाच गटात दोन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे नोंदी लावण्यात आल्याचा आरोप सैनिक पत्नी गायकवाड यांनी केला आहे.
सैनिक देशासाठी सीमेवर लढत असताना त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असताना, त्यांच्या घराच्या नोंदी जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून लावण्यात आल्या आहेत. सैनिक कुटुंबीयांना ग्रामपसेवक, सरपंच व काही सदस्य पदाचा गैरवापर करून अन्याय करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी व अतिक्रमणाची नोंद हटवून मालकी हक्काची नोंद लावण्याची मागणी उपोषणकर्त्या सैनिक पत्नीने केली आहे.