स्पर्धेत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन
अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी तर्फे सावेडी येथील डॉन बॉस्को शाळेच्या मैदानावर शुक्रवार (दि.22 सप्टेंबर) पासून विविध गटातील मुला-मुलींच्या तीन दिवसीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धा रविवार (दि.24 सप्टेंबर) पर्यंत रंगणार आहे. 9, 11, 13, 15 मुले आणि मुलींच्या खुल्या वयवर्ष गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा लीग आणि नॉक आऊट पद्धतीने खेळवली जाणार आहे. फुटबॉल खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने व मुलांमध्ये खेळाची तंत्रशुध्द माहिती होण्याच्या दृष्टीकोनाने ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, फिरोदिया शिवाजीयन्सचे मनोज वाळवेकर यांच्या विशेष सहकार्यातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सर्व खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि एटी फाऊंडेशनच्या अहमदनगर शाखा प्रमुख पल्लवी सैंदाणे यांनी आवाहन केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे प्रशिक्षक अभिषेक सोनवणे, अक्षय बोरुडे, मुख्य प्रशिक्षिका भक्ती पवार प्रयत्नशील आहे. स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
