6 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर अर्बन अँड रुरल कराटे असोसिएशनच्या वतीने खेळाडूंचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अहमदनगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई केली. या स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक पटकाविणारे नगरच्या 6 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र ओलम्पिक असोसिएशन मान्यता प्राप्त महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अहमदनगर अर्बन अँड रुरल कराटे असोसिएशन संघटनेच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत शहरातील 94 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडूंचे मार्गदर्शक तथा संघटनेचे अध्यक्ष जयसिंग काळे, सचिव अमोल काजळे, खजिनदार सरफराज सय्यद, प्रशिक्षक रोहित काळे, धर्मनाथ घोरपडे, महेश काकडे, सुरज गुंजाळ आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत श्रेयांश वाघ याने सुवर्ण पदक पटकाविले. शौर्य दाणे, युगंधरा जाधव, योगिता गावडे, आयुष काकडे, जय तापकीर यांनी रौप्य पदक तर श्री नंद्रे, श्रेया गुप्ता, वसुंधरा विघ्ने, चंचल लाड, लक्ष्मण दराडे, विराज कोळपे, युवराज बारस्कर, शिवाजी बारस्कर, ओम हिंगे, कार्तिकी पोहेकर, निल जाधव, रियान पठाण, तेजस भाबड, अक्षय चौधरी यांनी कास्य पदकाची कमाई केली. या विजेत्या खेळाडूंचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, क्रीडा सेलचे घनश्याम सानप यांनी अभिनंदन केले.
