• Fri. Mar 14th, 2025

बहुजन समाजाला सत्तेपासून लांब ठेवून प्रत्येक पक्षाने दावणीला बांधण्याचे काम केले -रमेश गालफाडे

ByMirror

Sep 19, 2023

बहुजनांच्या विकासासाठी शहरात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत विविध प्रश्‍नांवर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज विखुरला गेल्याने त्यांचे प्रश्‍न गंभीर बनले आहे. सत्तेपासून त्यांना लांब ठेवून प्रत्येक पक्षाने त्यांना दावणीला बांधण्याचे काम केले. समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी एक पक्ष, एक झेंड्याखाली बहुजन समाज एकवटण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन नेते रमेश (तात्या) गालफाडे यांनी केले.


अहमदनगर जिल्हा बहुजनांच्या विकासासाठी कार्यकर्ता बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना गालफाडे बोलत होते. यावेळी निफाडचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शिरसाट, सूर्यकांत भालेराव, अशोक साठे, शिवसेना मागासवर्गीय महाराष्ट्र सेल समन्वयक ॲड. वैजनाथ वाघमारे, सरपंच नारायणराव वैराळ, भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ आव्हाड, विजय वडागळे, अखिल भारतीय वारकरी विकास परिषदेचे साहेबराव पाचरणे पाटील, बापूसाहेब कसबे, नानासाहेब वाल्हेकर, आशाताई ससाने, उमेश साठे, लोकेश बर्वे, सतीश थोरात, संजय ताकवले, महेश भोसले, अफसर शेख, सागर साळवे, विजय शिंदे, अरविंद मंडलिक, लखन मिसाळ आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे गालफाडे म्हणाले की, बहुजन समाजात नेतृत्व विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्र होण्याची गरज आहे. सत्ताधारी व विरोधकांनी समाजाचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला. शेतकरी, युवक व कामगारांच्या प्रश्‍नापेक्षा जातीयवादी मुद्दे उपस्थित करुन सर्व प्रश्‍नांना बगल दिली जात आहे. यामध्ये बहुजन समाज भरडला जात असून, भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटित होण्याचे त्यांनी आवाहन केले. या बैठकीला उपस्थित बहुजन समाजातील पदाधिकाऱ्यांनी समाज जागृतीसाठी सुरु असलेल्या कार्याबद्दल गालफाडे यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *