कर्जत शाखेचा अपहार व विविध 9 मुद्दयांवर कारवाई करुन अहवाल देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या विविध मुद्द्यांवर कारवाईचे आश्वासन देवून देखील कारवाई होत नसल्याने सैनिक बँक बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.18 सप्टेंबर) शहरातील जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तर कर्जत शाखेच्या 1 कोटी 79 लाख अपहार, विविध 9 मुद्दयांवर कारवाई करुन अहवाल देण्याची व संबंधितांवर दप्तर दिरंगाईची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या उपोषणात बँकेचे संस्थापक सभासद विनायक गोस्वामी, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, बाळासाहेब नरसाळे, मेजर संपत शिरसाठ, शंकर नगरे, विक्रमसिंह कळमकर सभासद अशोक गंधाक्ते, पुरूषोत्तम शहाणे, किसन रासकर, भरत हटावकर, सौ.कुसुम पाचरणे, वैभव पाचरणे, जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे, सयाजी लगड, शब्बीर पठाण, बँकेचे विद्यमान संचालक सुदाम कोथिंबीरे, बबनराव सालके, संतोष यादव, बबन दिघे, आदी सहभागी झाले होते.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या विविध प्रकारच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालय समोर उपोषण करण्यात आले होते. 21 ऑगस्ट रोजी बैठक घेवून, त्या बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. परंतु अद्यापही सदरील मुद्द्यांवर कोणतीच कारवाई झालेली नसून, या प्रकरणात दप्तर दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बँकेच्या कर्मचारी भरतीमध्ये घेण्यात आलेल्या संचालकांचे नातेवाईक कर्मचाऱ्यांना कमी करणे, बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी बँकेचे संचालक अरुण रोहोकले यांचे शिफारस अहवाल व इतिवृत्तावर केलेल्या बोगस सह्या, असुरक्षित व विनातारण केलेले कर्ज वाटप, कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपये अपहार बाबत आर.एफ. निकम यांनी चौकशी सुरु केली असून, उर्वरित नऊ मुद्द्यांची प्रलंबीत असलेली कारवाई, बँकेतील अधिकारी, कर्मचारी सहकारी संस्थेमध्ये पदाधिकारी असल्याची माहिती मिळणे, बँकेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नियमबाह्य पद्धतीने भरती प्रक्रियेवर कारवाई करुन भरती रद्द होणे, कमी केलेले कर्मचारी पुन्हा सेवेत काम करत असून, बँकेतील गोपनीयतेचा भंग करत असताना सदर कर्मचारी, बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळावर कारवाई होणे, बँकेने सभासदांना नियमबाह्य पद्धतीने क्रियाशील व अक्रियाशील सभासदत्वाची नोटीस पाठविल्या प्रकरणी सुनावणी घेणे. या 9 मुद्दयांवर सहाय्यक निबंधक कार्यालय पारनेर यांच्याकडून अहवाल प्राप्त झालेला नाही. या मुद्द्यांवर कारवाई होत नसल्याने पुन्हा सैनिक बँक बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले आहे.