राज्य संघटनेची कार्यकारणी जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथे एरीयल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये 2023 ते 2028 या पाच वर्षासाठी राज्य संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी ठाणेचे सतीश जाधव व सचिवपदी अहमदनगरचे उमेश झोटिंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच कोषाध्यक्षपदी लातूरचे मोहन झुंजेपाटील, उपाध्यक्षपदी डॉ.सुभाष डोंगरे (यवतमाळ), कार्याध्यक्षपदी सुनील गंगावणे (मुंबई), तांत्रिक समिती अध्यक्षपदी अजिंक्य साळवी ठाणे, कार्यकारणी सदस्यपदी चिन्मय पाटील (पुणे), रसिका पलांडे (रत्नागिरी), प्रणिता तरोटे (अहमदनगर), प्रशांत जमदाडे (संभाजीनगर) यांची सर्वानुमते निवड झाली.
अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या एरियल सिल्क या खेळ प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत या खेळाचा प्रचार-प्रसार संघटनेच्या माध्यमातून केला जात आहे. आजपर्यंत झालेल्या मागील तीन राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने आपला दबदबा कायम राखला आहे. या खेळात आवड असलेल्या व उत्कृष्ट खेळाडूंना विविध स्पर्धा, प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रोत्साहन एरीयल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सुरु आहे.
या सभेचे आयोजन अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी अभिजित भोसले (पुणे), अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनच्या सचिव प्रणिता तरोटे, खजिनदार निलेश हराळे, आप्पा लाडाने आदी मान्यवर उपस्थित होते.
